भारतीय क्रीडा क्षेत्राचे भवितव्य व स्पोर्ट्सइंडीचे महत्त्वपूर्ण योगदान

भारतीय क्रीडा क्षेत्राचे भवितव्य व स्पोर्ट्सइंडीचे महत्त्वपूर्ण योगदान

07-JAN-2020

खेळ हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा घटक असलाच पाहिजे.खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहतेच परंतु खिलाडूवृत्तीमुळे समाजात वावरताना जीवनातील संकटे, समस्या व सुख दुःखांना सामोरे जाताना व जीवनातील यश अपयश पचवताना संयमी व खिलाडूवृत्ती खूप उपयोगी ठरते. त्याच प्रमाणे खेळामुळे नेतृत्व गुण, नियोजन, संघभावना व व्यवस्थापन या गुणांचा विकास होतो, ज्याचा संपूर्ण आयुष्यभर वेळोवेळी उपयोग होतो. भारतामध्ये बुद्धिबळ, धनुर्विद्या, भालाफेक तलवारबाजी, कबड्डी, खो-खो, कुस्ती बऱ्याच कालावधीपासून लोकप्रिय होते. आजच्या युगात आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात अथेलेटिक्स, पोहणे, बॉक्सिंग, निशाणेबाजी सारखे वैयक्तिक व फुटबॉल, हॉकी, टेनिस व क्रिकेट सारखे अनेक क्रीडाप्रकार लोकप्रिय आहेत. आशियाई व ऑलिंपिक सारख्या स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी खेळाडू मध्ये सर्वोत्तम स्पर्धा होते व देशासाठी खेळण्याचे सौभाग्य खेळाडूस प्राप्त होते.

खेळाडूंचा वैयक्तिक कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधीही मिळते. सध्याच्या परिस्थितीत केंद्रशासन व राज्य शासनाकडून पद्मश्री, पद्मभूषण,भारतरत्न, खेलरत्न पुरस्कार बरोबरच मोठ्या प्रमाणावर रोख रक्कमेचे पुरस्कार व नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने संधी दिली जाते ही खूप चांगली आश्वासक बाब आहे. खेळाडूंना राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये स्थान मिळवण्यसाठी संपूर्णपणे योगदान दिले पाहिजे. त्या क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी चांगल्या प्रकारची मैदाने, क्रीडा साहित्य, क्रीडामार्गदर्शक, चांगल्या पोषक आहाराची अत्यंत गरज असते. शासकीय पातळीवर उपरोक्त सुविधा खेळाडूंना पुरवण्याचा दिवसेंदिवस अधिक प्रयत्न होताना दिसतात. परंतु तरीही भारतासारख्या विशाल देशात जिल्हा, तालुका व गावपातळीवर सुविधा उपलब्ध नाहीत. ज्यामध्ये राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय, स्तराचे क्रीडा मैदाने, अत्याधुनिक क्रीडा साहित्य, क्रीडा प्रशिक्षक उपलब्ध नाहीत, ही वास्तविकता आहे. विशेषतः ग्रामीण व आदिवासी विभागात खेळाडुमध्ये प्रतिभा, कौशल्य व निपुण ता मुबलक व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. परंतु विविध सुविधा, माहिती, मार्गदर्शन व आर्थिक परिस्थीतीमुळे त्यांना लाभ मिळू शकत नाही.

अशा परिस्थितीमध्ये स्पोर्ट्सइंडी सारख्या संस्था क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंना मदतीसाठी तत्पर असतात. त्याचा लाभ खेळाडूंनी घेतला पाहिजे. शासकीय यंत्रणा बरोबरच अशा सामाजिक सेवा संस्थांचा सक्रिय सहभाग खूप मोलाचा ठरतो. वैयक्तिक माझ्या जीवनात कबड्डी, खो खो, अथलेटिक्स, क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन खेळांचा संबंध आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा अथेलेटिक्स संघाचा संघनायक म्हणून नेतृत्व करण्याची (राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेमध्ये) संधी मिळाली. परंतु मराठवाड्यासारख्या मागासलेल्या व ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असल्यामुळे योग्य त्या सुविधा व मार्गदर्शनाचा अभाव याचा सामना करावा लागला. खेळांची आवड, सराव, सुविधा व मार्गदर्शनाचा लाभ विद्यापीठात मिळाल्यामुळे मला सहभाग नेतृत्वाची संधी मिळाली. शासकीय सेवेत विविध ठिकाणी विविध स्तरांवर काम करताना मिळेल तेव्हा प्रत्येक वेळी ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देणे, साहित्य उपलब्ध करून देणे, विविध स्पर्धांचे (पोलीस व नागरिकांसाठी) आयोजन करणे व पोलीस विभागात खेळाडूंना नोकरीत संधी उपलब्ध करून देण्याचा योग प्राप्त झाला.आजच्या स्पर्धेच्या युगात खेळाडू म्हणून करीयर करण्याचे विद्यार्थ्याने ठरवले तर संपूर्णपणे लक्ष्य केंद्रित करून उपलब्ध सुविधा व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन कठीण परिस्थितीवर दुर्दम्य इच्छाशक्ती व निर्धाराने मात करून संधीचे सोने करता येऊ शकते असा माझा ठाम विश्वास आहे.

भारतासारख्या लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसरा क्रमांक असलेल्या देशाच्या आशियाई व ऑलिंपिक स्पर्धे मधील कामगिरीकडे लक्ष टाकल्यास पद तालिकेमध्ये आपण खूप मागे आहोत. ही स्थिती सुधारण्यासाठी लहान मुलांच्या प्रतिभेचा शोध घेऊन तालुका जिल्हा पातळीवर त्यांना लागणाऱ्या सोयी, सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास, सततच्या कठोर परिश्रमाच्या जोरावर यशस्वी खेळाडू होऊ शकतो. स्पोर्ट्सइंडी सारख्या दूरदृष्टी व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक यशस्वी खेळाडू तयार होण्यास निश्चित मदत होईल असा आत्मविश्वास वाटतो.प्रतिभाशाली, होतकरू, कष्टाळू व गरीब खेळाडूंनी स्पोर्ट्सइंडीच्या मदतीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा व स्वतः चे करीयर करून भारताचे व स्पोर्ट्सइंडीचे नाव उज्ज्वल करावे. क्रीडाक्षेत्रातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या उन्नतीसाठी, धेय्यप्राप्तीसाठी व यशासाठी स्पोर्ट्सइंडी परिवाराच्या संपूर्ण टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन व हार्दिक आभार.


IPS डॉ.विठ्ठल जाधव

भा.पो.से. विशेष पोलिस महानिरीक्षक (सेवानिवृत्त),

महाराष्ट्र सरकार.

Enquiry