रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचा दणदणीत मालिका विजय


अहमदाबाद : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा सामनाही जिंकला आणि मालिका ३-० अशी सहजपणे खिशात टाकली. मालिकेतील याअखेरच्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्वबाद २६५ धावा धावा केल्या. करोना झाल्याने पहिल्या दोन लढतीला मुकलेल्या श्रेयस अय्यरने ८० धावांची खेळी केली. श्रेयसला रिषभ पंतने ५४ धावा करत चांगली साथ दिली. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला अपयश आले आणि त्यांच्यावर मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. भारताच्या २६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव गडगडला आणि भारताने त्यांच्यावर ९६ धावांनी दणदणीत विजय साकारत मालिका ३-० अशी जिंकली.

भारताच्या डावाची सुरूवात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी केली. चौथ्या षटकात रोहित १३ धावांवर बाद झाला. त्याच ओव्हरमध्ये विराट कोहली शून्यावर माघारी परतला. तर १०व्या षटकात शिखर १० धावांवर माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ४२ अशी झाली. मैदानावर असलेल्या श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. पंत ५४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५६ धावा करून बाद झाला. त्या पाठोपाठ सूर्यकुमार ६ धावांवर माघारी परतला. दरम्यान अय्यरने देखील अर्धशतक पूर्ण केले. तो शतक करेल असे वाटत असतानाच बाद झाला. त्याने १११ चेंडूत ९ चौकारासह ८० धावा केल्या. भारताचा निम्मा संघ १६४ धावांर पॅव्हेलियनमध्ये गेला होता. सातव्या विकेटसाठी दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी भागिदारी केली. दीपकने ३८ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांसह ३८ धावा केल्या. सुंदरने ३४चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह ३३ धावा केल्या. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या लढतीत भारताने चार बदले केले. शिखर धवन, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव आणि दीपक चहर यांना संधी दिली होती चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी यावेळी दमदार अष्टपैलू कामगिरी केली.

Enquiry