जागतिक स्पर्धेत सिंधूची अंतिम फेरीत धडक; चुरशीच्या लढतीत रोमहर्षक विजय

यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सिंधू सातत्यपूर्ण कामगिरी करत होती, पण उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात तिला अपयश आले होते. पण आता सिंधूने जोरदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळत असून तिने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

बाली : भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूने वर्षअखेरीस चांगली कामगिरी करत बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या (BWF World Tour Finals) अंतिम फेरीत धडक मारली आहे. २०१८ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सिंधूने शनिवारी (४ डिसेंबर) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिची चिवट प्रतिस्पर्धी जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१५, १५-२१, २१-१९ असा पराभव केला. रविवारी (५ डिसेंबर) होणाऱ्या अंतिम फेरीत सिंधूचा सामना दक्षिण कोरियाच्या एन सेयोंगशी होणार आहे. सेयोंगने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मलेशियाच्या अव्वल मानांकित पोर्नपावी चोचुवॉंगचा पराभव केला.

यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सिंधू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे, पण अंतिम फेरी गाठण्यात तिला अपयश येत होते. त्यामुळे ती विजेतेपदापासून वंचित राहिली आहे. इंडोनेशिया ओपन, फ्रेंच ओपन आणि इंडोनेशिया मास्टर्समध्ये अंतिम-४ मध्ये पराभूत झाल्यानंतर तिला बाहेर जावे लागले. २०१८ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत सिंधूने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

चुरशीची झालेल्या या लढतीत सिंधूने चांगली सुरुवात केली, पण तिला दुसरा सेट गमावावा लागला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली. हा सामना एक तास १० मिनिटे चालला. या दोन खेळाडूंमधील हा २१ वा सामना होता. या विजयासह सिंधूने जपानच्या खेळाडूवर १३-८ अशी आघाडी घेतली आहे. अंतिम सामना जिंकल्यास या मोसमातील तिचे हे पहिले विजेतेपद ठरेल.

Enquiry