एच पी रॉयल्स, आझम स्पोर्ट्स अकादमी संघांची विजयी आगेकूच

गौतमी नाईकचे दमदार शतक : किरण नवगिरेची आक्रमक फलंदाजी 

पुणे / प्रतिनीधी : आझम स्पोर्ट्स अकादमी व एच पी रॉयल्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आझम महिला क्रिकेट टी-२० करंडक स्पर्धेत आपली विजयी आगेकूच कायम राखली.  

आझम स्पोर्ट्सच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये एच पी रॉयल्स संघाने पीडीसीए संघाला तब्बल २०६ धावांनी पराभूत केले. एच पी रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना गौतमी नाईकच्या दमदार शतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकांत १ बाद २५० धावा केल्या. गौतमी नाईकने नाबाद १२० (६५ चेंडू, १६ चौकार, ३ षटकार) धावांची खेळी केली. तिला पूनम खेमनार हिने ६९ (४० चेंडू, ९ चौकार, १ षटकार) धावा करताना सुरेख साथ दिली. सायली लोणकरने ३ चौकाराच्या साहाय्याने नाबाद २३ धावा केल्या. पीडीसीए संघाकडून पार्वती बकालेने एक गडी बाद केला. 

उत्तरार्धात सायली लोणकरच्या भेदक माऱ्यासमोर पीडीसीए संघाला ९.१ षटकांत सर्वबाद ४४ धावा करता आल्या. सायली लोणकरने ४ गडी बाद केले. अभिलाषा पाटील, मुक्ता मगरे, सोनल पाटील व प्रज्ञा वीरकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पीडीसीए संघाकडून पार्वती बकाले हिने १७ तर प्रियांका संगवान हिने ११ धावांची खेळी केली. एच पी रॉयल्स संघाच्या गौतमी नाईकला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

दुसऱ्या लढतीमध्ये आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने रायझिंग डे संघाला ९ गडी राखून पराभूत केले. रायझिंग डे संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १०१ धावांपर्यंत मजल मारली. यात इरा जाधवने दमदार फलंदाजी करताना ६४ चेंडून ५२ (५ चौकार) धावांची खेळी केली. जान्हवी चव्हाण हिने १९ ( २ चौकार) तर ईशा घुलेने १४ (२ चौकार) धावा केल्या. संजना शिंदेने २ तर उत्कर्षा पवार व ऋषीता जंजाळ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 

आझम संघाने किरण नवगिरेच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ७ षटकांत १ बाद १०५ धावा करताना विजय साकारला. किरण नवगिरेने २४ चेंडूत ११ चौकार व ५ षटकारांच्या साहाय्याने ७७ धावा करताना संघाला एकहाती विजय मिळवून दिला. श्रावणी देसाईने २८ (४ चौकार) धावांची खेळी केली. सई चव्हाण हिने १४ धावांच्या मोबदल्यात एक गडी बाद केला. किरण नवगिरेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

Enquiry